बेळगाव : मरिहाळ पोलीस ठाणे हद्दीतील शिंदोळी गावातील महालक्ष्मीपूरम नगर येथे झालेल्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी यशस्वी उलगडा केला असून एका आरोपीला अटक करून सुमारे 23 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
10 मे 2026 रोजी अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत ट्रेझरीमध्ये ठेवलेले 42 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी मरिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घरफोडीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून तपास सुरू केला. 25 मे रोजी शिंदोळी गावातील इंदालनगर परिसरात गस्त घालत असताना एका संशयित व्यक्तीची चौकशी करण्यात आली. समाधानकारक उत्तरे न दिल्याने अधिक तपास केला असता त्याने शिंदोळी येथील घरफोडीची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख विश्वनाथ दुर्गप्पा मुत्तूर (वय 26), रा. बेविनमुट्टी, ता. जि. बागलकोट अशी झाली आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही मरिहाळ पोलीस ठाण्यातील तीन तसेच काकती पोलीस ठाण्यातील एका घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद असल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 134 ग्रॅम सोन्याचे दागिने, 510 ग्रॅम चांदीचे दागिने आणि अन्य मुद्देमालासह एकूण 23 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मरिहाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कामगिरीबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले आहे.
k
