बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत बेळगाव शहरात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना रोख शिष्यवृत्ती, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला उद्योजक व समाजसेवक सुहास चांडक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वरा मोरे आणि पूर्णा प्रभू यांनी संपूर्ण वंदे मातरम् सादर केले. प्रमुख अतिथींच्या हस्ते भारतमाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर स्वाती घोडेकर यांनी अतिथींचा परिचय करून दिला. पांडुरंग नायक यांनी परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यानंतर सुहास चांडक यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
दहावीच्या परीक्षेत इंग्रजी माध्यमातून संजोता पांडुरंग व्हावळ (९९.५ टक्के, सेंट मेरीज स्कूल), मराठी माध्यमातून सोहम सतीश हळदणकर (९८.५ टक्के, मराठी विद्यानिकेतन) आणि कन्नड माध्यमातून अनुषा बसवराज कन्नाळ (९८.७ टक्के, उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूल) यांनी शहरात प्रथम क्रमांक मिळविला.
बारावीच्या परीक्षेत वाणिज्य शाखेत ध्वनी संतोष कुलकर्णी (९९.८ टक्के, गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स), विज्ञान शाखेत समीर कल्लापूर (९९.३ टक्के, केएलई स्वतंत्र पदवीपूर्व कॉलेज) आणि कला शाखेत सृष्टी चिदानंद सलोनी (९९ टक्के, लिंगराज पदवीपूर्व कॉलेज) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या सर्व विद्यार्थ्यांचा पालकांसह मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी भारत विकास परिषदेच्या सदस्यांच्या गुणवंत पाल्यांनाही विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुणा नाईक यांनी केले. व्ही. आर. गुडी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले, तर परिषदेचे सचिव के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राचार्य व्ही. एन. जोशी, डॉ. जे. जी. नाईक, विनायक घोडेकर, डी. वाय. पाटील, सुभाष मिराशी, गणपती भुजगुरव, पी. एम. पाटील, जया नायक, शुभांगी मिराशी, प्रिया पाटील, स्मिता भुजगुरव, मंगल कुलकर्णी, ज्योती प्रभू, अक्षता मोरे, प्रा. प्रतिभा हल्लेपनवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
