खानापूर : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांची बैठक रविवारी श्री शिवस्मारक येथे उत्साहात पार पडली. बैठकीत मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी युवकांनी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी रावसाहेब वागळे महाविद्यालयाचे प्राध्यापक शंकर गावडा आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावचे चिटणीस प्रतीक पाटील यांनी युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
शंकर गावडा यांनी सीमाप्रश्नाचा इतिहास उलगडून सांगताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चळवळीची माहिती दिली. मराठी भाषा, शाळा आणि संस्कृतीचे जतन करण्याची जबाबदारी युवकांनी समर्थपणे पार पाडली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
प्रतीक पाटील यांनी सीमालढ्याचा ७० वर्षांचा इतिहास सांगत मराठी शाळांचे महत्त्व अधोरेखित केले. मराठी शाळा या मराठी भाषेचा कणा असून त्यांचे संवर्धन आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावर्षापासून खानापूर तालुक्यातील मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाची जबाबदारी स्वीकारून कार्याची सुरुवात करावी, असेही ते म्हणाले.
युवा समितीचे पदाधिकारी साईनाथ शिरोडकर यांनी सीमालढ्यात सोशल मीडियाचा प्रभावी वापर, स्पर्धा परीक्षांचे महत्त्व तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
बैठकीत समितीच्या ध्येय-धोरणाशी बांधील राहून मराठी भाषा, संस्कृती आणि सीमाभागातील प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार युवकांनी व्यक्त केला.
यावेळी सुनील पाटील, शुभम कांबळे, बाळकृष्ण पाटील, प्रसन्न पाटील, लक्ष्मण भातकांडे, वैभव कारेकर, संदेश कोडचवाडकर, प्रसाद देसाई, यतीन पाटील, मुकेश गुरव, आर्यन पाटील, लक्ष्मण शास्त्री, राम चिखलकर, यश गावडे, प्रथमेश मेलगे, चेतन हंगीरगेकर, विकास पाटील, सोमनाथ गोरे, पृथ्वीराज गुरव, राहुल चापगावकर, आदित्य देसाई, ओंकार पाटील यांच्यासह अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
