कचेरी रोडवर अस्वच्छतेचे साम्राज्य; नागरिकांकडून तातडीच्या स्वच्छतेची मागणी

कचेरी रोडवर अस्वच्छतेचे साम्राज्य; नागरिकांकडून तातडीच्या स्वच्छतेची मागणी

बेळगाव, ता. २२ : शहरातील मध्यवर्ती भागातील कचेरी रोड व खंजर गल्ली परिसरात असलेल्या गटारी तुंबल्याने आणि नियमित स्वच्छतेअभावी अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, गाळ व सांडपाणी साचल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक महिन्यांपासून गटारींची स्वच्छता करण्यात आलेली नाही. काही ठिकाणी गटारींचे स्लॅब तुटलेल्या अवस्थेत असून त्यामुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा जवळ आल्याने तुंबलेल्या गटारांमुळे पाणी रस्त्यावर साचण्याची तसेच सांडपाणी वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कचेरी रोड हा शहरातील महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावरून तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पंचायत तसेच इतर शासकीय कार्यालयांकडे नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. अशा ठिकाणी असलेली अस्वच्छता प्रशासनाच्या दुर्लक्षाचे द्योतक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

परिसरातील नागरिकांनी संबंधित महापालिका प्रशासनाने तातडीने गटारींची स्वच्छता करून साचलेला कचरा व गाळ हटवावा, तसेच तुटलेले स्लॅब दुरुस्त करावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 2 =

error: Content is protected !!