“कबीर कोहिनूर राष्ट्रीय सन्मान” डॉ. दत्तात्रय डी. देसाई यांना जाहीर

“कबीर कोहिनूर राष्ट्रीय सन्मान” डॉ. दत्तात्रय डी. देसाई यांना जाहीर

बेळंकी (ता. बेळगाव) येथील रहिवासी तसेच नवोदित कवी डॉ. दत्तात्रय डी. देसाई यांना प्रतिष्ठेचा “कबीर कोहिनूर राष्ट्रीय सन्मान” जाहीर झाला आहे. राजस्थान राज्यातील नागौर जिल्ह्यातील बड़ी खाटू येथे अखिल भारतीय कबीर मठ यांच्या वतीने २९ जून रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात संस्थेचे प्रमुख संत श्री नानकदासजी महाराज यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

सध्या डॉ. देसाई हे दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा ट्रेनिंग कॉलेज येथे हिंदी प्रवक्ता म्हणून कार्यरत आहेत. हिंदी साहित्यावरील प्रेम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि लेखनाची आवड यामुळे त्यांनी नवोदित कवी म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्यांचे “दस्तक… अनसुनी आहट” आणि “दहलीज… एक सीमा” हे दोन स्वरचित काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून त्यामध्ये देशप्रेम, समाजप्रबोधन, राजकारण, व्यंग्य, प्रेम आदी विविध विषयांवरील कविता समाविष्ट आहेत. त्यांच्या अनेक कविता दैनिक “स्वतंत्र वार्ता” मधूनही प्रकाशित झाल्या आहेत.

हिंदी साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, प्रभावी लेखनशैली आणि साहित्यसेवेबद्दल त्यांना हा राष्ट्रीय सन्मान जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच वर्षी रवींद्रनाथ टागोर स्वदेश इंडिया ग्लोरीज संस्थेकडून त्यांना “स्वदेश भारत गौरव सन्मान २०२६” देखील जाहीर झाला आहे.

डॉ. दत्तात्रय डी. देसाई यांनी प्राथमिक शिक्षण बेळगाव जिल्ह्यातील छोट्याशा बेळंकी गावात घेतले. पुढील उच्च शिक्षण त्यांनी शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केले. सध्या ते हिंदी भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × five =

error: Content is protected !!