शिक्षणासाठी समाजाने पुढे यावे : ॲलन विजय मोरे यांचे आवाहन
गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक बळ देण्यासाठी शांताई विद्या आधारतर्फे एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. शांताई वृद्धाश्रम येथे आयोजित कार्यक्रमात चार गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी सहाय्याचे धनादेश प्रदान करण्यात आले. हे धनादेश ॲलन विजय मोरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान एका गरजू विद्यार्थ्याच्या पालकांना मान्यवर आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी बोलताना ॲलन विजय मोरे यांनी शिक्षणासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित केली. “गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रत्येकाने आपल्या परीने हातभार लावला पाहिजे. शिक्षण हीच उज्ज्वल भविष्यासाठीची खरी ताकद आहे,” असे ते म्हणाले.
गेल्या १५ वर्षांपासून शांताई विद्या आधार ही संस्था जुन्या वर्तमानपत्रे, पुस्तके तसेच रद्दी साहित्य संकलित करून त्यातून मिळणारा निधी पूर्णपणे गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी वापरत आहे. या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली असून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवे बळ मिळाले आहे.
संस्थेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले असून, जुनी वर्तमानपत्रे, पुस्तके आणि पुनर्वापर करता येणारे साहित्य शांताई विद्या आधारला दान करून या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे सांगण्यात आले.
शांताई विद्या आधार तसेच माजी महापौर विजय मोरे आणि विजय पाटील यांच्या माध्यमातून राबविण्यात येणारा हा उपक्रम शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रेरणादायी प्रयत्न असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
