बेळगाव : टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघात विशाल मोडक यांच्या तरंग अकादमीतर्फे तबला व गिटार वादन वर्गांना प्रारंभ करण्यात आला. वरेरकर नाट्य संघाचे कार्यवाह जगदीश कुंटे यांच्या हस्ते फीत कापून वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मराठी ट्रेनिंग कॉलेजचे निवृत्त शिक्षक सुरेश नाझरे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन प्रसंगी बोलताना जगदीश कुंटे म्हणाले की, “साहित्य, नाट्य, चित्रपट, संगीत, नृत्य आणि चित्रकला अशा विविध कलाक्षेत्रांतील उपक्रम वरेरकर नाट्य संघात सातत्याने राबविले जात आहेत. त्यामुळे हे ठिकाण सर्वसमावेशक सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित होत असून, कलारसिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी विशाल मोडक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. समीरा मोडक तसेच विद्यार्थ्यांनी प्रार्थना सादर केली. या कार्यक्रमाला अनेक कलारसिक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
दरम्यान, सोमवार व बुधवारी गिटार वादनाचे तर मंगळवार आणि गुरुवारी तबला वादनाचे वर्ग घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
