बेंगळुरू: कर्नाटकातील मध्य भाग आणि उत्तर कर्नाटकाला जोडणारी बेंगळुरू–मुंबई सुपरफास्ट रेल्वे सेवा जून महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
ही रेल्वे बेंगळुरूहून तुमकूर, दावणगेरे, हावेरी, हुबळी–धारवाड आणि बेळगाव मार्गे वाणिज्य नगरी मुंबईकडे धावणार आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भविष्यात या सुपरफास्ट रेल्वेला वंदे भारत स्लीपर स्वरूप देण्याची मागणी करण्यात आली असून, त्यालाही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले.
यावेळी हुबळी येथील सिद्धारूढ स्वामीजी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाबाबत तसेच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. तसेच खासदार व माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सुचवलेल्या लोकापूर–सवदत्ती–धारवाड रेल्वे मार्गाच्या पुनर्सर्वेक्षणाबाबतही चर्चा झाली असून, केंद्र सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.
या नव्या रेल्वे सेवेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री यांचे आभार मानण्यात आले आहेत. तसेच रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनाही धन्यवाद देण्यात आले.
ही सेवा सुरू झाल्यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
