कपिलतीर्थ तलावाचा विकास राजकारणापासून दूर ठेवून करणार — आमदार राजू सेठ

कपिलतीर्थ तलावाचा विकास राजकारणापासून दूर ठेवून करणार — आमदार राजू सेठ

बेळगाव : कपिलेश्वर मंदिराच्या पाठीमागील कपिलतीर्थ तलावात रविवारी (दि. ३ मे) घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायक असल्याचे सांगत, या परिसराचा विकास कोणतेही राजकारण किंवा श्रेयवाद न आणता करण्यात येईल, असे आश्वासन बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी दिले.

घटनेच्या दिवशी स्वतः उपस्थित राहून प्रशासनाची यंत्रणा कार्यरत केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर ४ मे रोजी तलाव परिसरातील घरांना धोका निर्माण होऊन तडे जाणे व माती ढासळण्याच्या घटना घडल्याने परिस्थिती गंभीर बनली होती, असेही त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर कपिलतीर्थ तलावाचा सुशोभीकरण, विकास आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने साडेतीन कोटी रुपयांचा निधी आपल्या आमदार निधीतून उपलब्ध करून देत असल्याची घोषणा त्यांनी केली. गोडसे कुटुंबियांचे म्हणणे ऐकून त्यानुसार पालिका प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, परिसरातील ऐतिहासिक कपिलेश्वर व्यायामशाळा व समुदाय भवनाचा विकास करण्याचा मानस असून, येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित व प्रसन्न वातावरण मिळावे, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच जिल्हा प्रशासन व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थळ पाहणी करून कामाला सुरुवात केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, सामाजिक कार्यकर्ते कपिल भोसले तसेच गोडसे कुटुंबियांच्या वतीने श्रीकांत गोडसे आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − ten =

error: Content is protected !!