उदगीर येथील राष्ट्रीय अधिवेशनात सीमाप्रश्नाला जोर; मंत्री व पत्रकारांचा 1 लाख सह्यांच्या मोहिमेला पाठिंबा

उदगीर येथील राष्ट्रीय अधिवेशनात सीमाप्रश्नाला जोर; मंत्री व पत्रकारांचा 1 लाख सह्यांच्या मोहिमेला पाठिंबा

उदगीर (जि. लातूर) : महाराष्ट्र–कर्नाटक सीमाप्रश्नाचा खटला 2004 पासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, या प्रकरणाची सलग सुनावणी घेऊन त्वरित निकाल द्यावा, अशी मागणी करणारे 1 लाख सह्यांचे निवेदन सरन्यायाधीशांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मोहीम बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे राबविण्यात येत आहे.


लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान या सह्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. देशभरातील विविध भागांतून आलेल्या पत्रकारांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, नागपूर, बीड, नांदेड, अहिल्यानगर, नाशिक यांसह कर्नाटक सीमाभागातील बिदर जिल्ह्यातील भालकी, औराद येथील प्रतिनिधींनीही सह्या करून पाठिंबा दर्शविला.
या निवेदनावर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, दैनिक ‘लोकमत’चे समूह संपादक राजेंद्र दर्डा, आमदार रोहित पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख तसेच विश्वस्त किरण नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी सह्या करून या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.


पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर, उपाध्यक्ष सुहास हुद्दार, प्रतिनिधी शेखर पाटील आणि कार्यकारिणी सदस्य शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सह्या मोहीम राबविण्यात येत आहे.
सीमाभागातील जनतेला न्याय मिळावा आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा निघावा, या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली असून, लवकरच हे निवेदन सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे सादर करण्यात येणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 5 =

error: Content is protected !!