तात्काळ दिलासा द्या : पेट्रोल कॅनमधून देण्यास परवानगी द्या – व्यापाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

तात्काळ दिलासा द्या : पेट्रोल कॅनमधून देण्यास परवानगी द्या – व्यापाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बेळगाव : शहरातील व्यापारी, उद्योग व सेवा क्षेत्रातील प्रतिनिधींनी पेट्रोल पंपांवर कॅन/बॉटलमध्ये पेट्रोल देण्यावरील निर्बंधामुळे गंभीर अडचणी निर्माण झाल्याचे सांगत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन (IAS) यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. सतत होणाऱ्या वीज कपातीमुळे जनरेटरवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना सध्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षा आणि इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेला निर्णय समजण्यासारखा असला तरी संपूर्ण बंदीमुळे व्यापारी, औद्योगिक व अत्यावश्यक सेवा क्षेत्र अडचणीत आले आहे. शहरातील अनेक भागांत पावसामुळे किंवा पायाभूत सुविधा कामांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे दुकाने, कापड व्यवसाय, उद्योग, कार्यालये, रुग्णालये, हॉटेल्स, कोल्ड स्टोरेज, मेडिकल स्टोअर्स आणि बँकिंग व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी जनरेटर अत्यावश्यक ठरले आहेत.

पेट्रोल कॅनमधून मिळत नसल्याने जनरेटर सुरू ठेवता येत नसल्यामुळे व्यापार्‍यांना आर्थिक तोटा, व्यवहारांमध्ये अडथळे, तापमान नियंत्रित वस्तूंचे नुकसान, आरोग्यसेवांमध्ये व्यत्यय तसेच डिजिटल व्यवहार ठप्प होण्यासारख्या समस्या निर्माण होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बेळगाव हे महत्त्वाचे व्यापारी व औद्योगिक केंद्र असल्याने व्यापार आणि सेवा अखंड सुरू राहणे गरजेचे असल्याचे नमूद करत व्यापाऱ्यांनी काही मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये जनरेटर वापरासाठी मर्यादित प्रमाणात कॅनमधून पेट्रोल देण्यास परवानगी द्यावी, वैध ओळखपत्र, व्यवसाय नोंदणी किंवा जीएसटी क्रमांकाच्या आधारे पेट्रोल देण्याची व्यवस्था करावी, तसेच पेट्रोल पंप चालकांसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर बीसीएमएचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर, सचिव मुकेश खोडा, वरिष्ठ उपाध्यक्ष मुकेश संघवी, उपाध्यक्ष राजू पालीवाला, लालनचंद चप्रू, नितेश जैन, विकास कलघटगी तसेच माजी अध्यक्ष बसवराज जवळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून व्यापारी व उद्योग क्षेत्राला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − 5 =

error: Content is protected !!