‘शांतपणे जगू द्या’ नाटिकेद्वारे मुलांनी मनं जिंकली

‘शांतपणे जगू द्या’ नाटिकेद्वारे मुलांनी मनं जिंकली

बेळगाव : लोकमान्य ग्रंथालय प्रणित बुक लव्हर्स क्लब आणि वरेरकर नाट्य संघातर्फे आयोजित नाट्यदर्पण कार्यक्रम शनिवारी (दि. 4 एप्रिल 2026) सायंकाळी उत्साहात पार पडला. नाट्यप्रशिक्षण शिबिरातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट नाट्याविष्काराने उपस्थितांची मनं जिंकली.

जागतिक रंगभूमी दिन (27 मार्च) निमित्त वरेरकर नाट्य संघातर्फे आयोजित 8 दिवसांच्या नाट्य प्रशिक्षण शिबिराची सांगता या कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. प्रसिद्ध नाट्यकर्मी नीता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी शिकलेले धडे रंगमंचावर प्रभावीपणे सादर केले.

‘आम्हाला शांतपणे जगू द्या’ या नाटिकेद्वारे सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर भाष्य करत मुलांनी शांततेचा संदेश दिला आणि प्रेक्षकांची दाद मिळवली. त्यानंतर साहित्यातील नवरसांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

यावेळी नाट्यकर्मी नीता कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नाट्यकर्मी आसावरी भोकरे यांनी “नाटकाची कुळकथा” या विषयावर पाश्चात्य रंगभूमी तसेच भारतीय पारंपरिक नाट्यकला व शास्त्र याविषयी थोडक्यात माहिती दिली.

यानंतर चिन्मय शेंडे (लखोबा लोखंडे – ‘तो मी नव्हेच’), श्रेया सव्वाशेरी (मंजुळा – ‘ती फुलराणी’), जगदीश कुंटे (पंपुशेट – ‘कवडी चुंबक’), प्रिया काळे (संभाजी – ‘रायगडला जेव्हा जाग येते’) आणि आसावरी भोकरे (छत्रपती शिवाजी – ‘रायगडला जेव्हा जाग येते’) यांनी सादर केलेल्या नाट्यप्रवेशांनी कार्यक्रमात रंगत आणली.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जगदीश कुंटे यांनी केले. विद्या देशपांडे यांनी सूत्रसंचालन तर आरती आपटे यांनी आभार मानले. सुट्टीतील या उपक्रमाचा आनंद उपस्थितांनी घेत आयोजकांचे कौतुक केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 + 10 =

error: Content is protected !!