घुमटमाळ मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

घुमटमाळ मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

बेळगाव : हिंदवाडी येथील पुरातन श्री घुमटमाळ मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. यानिमित्त १ व २ एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

१ एप्रिल रोजी सायंकाळी संगीत गुरु शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आदिशक्ती महिला मंडळाच्या महिलांनी भजन सादर केले. त्यानंतर वारकरी संप्रदायाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे भजनाचा कार्यक्रम झाला.

गुरुवारी पहाटे अभिषेक करण्यात आला. त्यानंतर ह.भ.प. कृष्णमूर्ती बोंगाळे यांचे हनुमान जन्मोत्सवावर कीर्तन झाले. सकाळी सव्वा सहा वाजता पाळणा गीत व गायनाद्वारे जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

एक्सलंट योगा क्लासेसचे योगगुरू शंकरराव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक श्रीरामरक्षा स्तोत्र व हनुमान चालीसा पठण करण्यात आले, ज्यामध्ये अनेक स्त्री-पुरुषांनी सहभाग घेतला.

दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हजारो भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला. माजी महापौर मंगेश पवार व नगरसेवक नितीन जाधव यांनीही उपस्थित राहून महाप्रसाद वाटपात सहभाग घेतला.

या कार्यक्रमासाठी ट्रस्ट कमिटी सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, उपाध्यक्ष कुलदीप भेकणे, सचिव प्रकाश माहेश्वरी तसेच सदस्य बाबुराव पाटील, संभाजी चव्हाण, गोपाळराव बिर्जे, अनंत लाड, नेताजी जाधव, रघुनाथ बांडगी, सुनील चौगुले, चंद्रकांत पवार, विक्रम चिंडक, हिरालाल पटेल, सुनील सरनोबत, पुजारी बाळू किल्लेकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक भाविकांनी सढळ हस्ते देणग्या देत सहभाग नोंदविला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − five =

error: Content is protected !!