बेळगाव : काकती पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपीला पाच वर्षांची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या प्रकरणातील आरोपी रामा मुकुंद तरळे (वय ४५, रा. दत्त गल्ली, मण्णूर, ता. जि. बेळगाव) याने ३ मार्च २०२३ रोजी शाळेतून घरी परतत असलेल्या अल्पवयीन मुलीला आपल्या कारमध्ये बसवून तिच्यावर अश्लील कृत्य केल्याची तक्रार दाखल झाली होती. या घटनेनंतर काकती पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७/२०२३ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (अ), ३७६ तसेच पोक्सो कायदा २०१२ च्या कलम ६, ८ व १२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक किरणकुमार तावरगी व त्यांच्या पथकाने करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयातील एफटीएससी-०१ न्यायालयात झाली.
सुनावणीनंतर न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी आरोपी रामा मुकुंद तरळे याला ११ मार्च २०२६ रोजी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
सरकारतर्फे सार्वजनिक अभियोक्ता एल. व्ही. पाटील यांनी बाजू मांडली. या प्रकरणाचा तपास एसीपी गंगाधर बी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होता. तसेच पोलिस निरीक्षक किरणकुमार तावरगी, पीएसआय एच. एम. कबाडी, सहाय्यक परशुराम बी. एच. आणि कोर्ट मॉनिटरिंग सेलचे कर्मचारी राजू एस. लमाणी यांनी या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली.
