माधुरी जाधव फौंडेशनच्या माध्यमातून धनादेश सुपूर्द; डोळ्याच्या उपचारासाठी सहकार्याचा हात
बेळगाव / प्रतिनिधी :
फटाक्यांच्या आतषबाजीत गंभीर जखमी झालेल्या शहापूर येथील शिवा लोहार याच्या उपचारासाठी समाजातील विविध घटकांकडून मदतीचा ओघ सुरू आहे. समाजसेविका माधुरी जाधव यांच्या माधुरी जाधव फौंडेशनच्या माध्यमातून श्रीमती अनुजा बाळेकुंद्री यांनी शिवा लोहार याला पुढील उपचारासाठी ११ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.
दिवंगत पती सुभाष बाळेकुंद्री यांच्या स्मरणार्थ ही मदत देण्यात आली असून त्याचा धनादेश शिवा लोहार याला सुपूर्द करण्यात आला. या मदतीमुळे शिवाच्या उपचारासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
भारत-वेस्टइंडिज क्रिकेट सामन्यात भारताच्या विजयाचा आनंद साजरा करताना झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीत शिवा लोहार (वय ३२, रा. नवी गल्ली, शहापूर) गंभीर जखमी झाला होता. या अपघातात त्याचा एक डोळा निकामी झाला असून दुसरा डोळा वाचवण्यासाठी त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
भारत नगर परिसरातील लंबोदर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता असलेला शिवा सध्या उपचार घेत असून त्याच्या मदतीसाठी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत.
यावेळी समाजसेविका माधुरी जाधव (पाटील) आणि मंडळाचे अध्यक्ष पवन धामणेकर यांनी अनुजा बाळेकुंद्री यांचे आभार मानले. तसेच सत्यम कोनेरी, सुमित पाटील, शुभम पेवे, आकाश पाटील आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवाच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याने नागरिकांनी शक्य ते सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
