बेळगाव : शहरातील मालमत्ता करात ३ टक्के वाढ करण्याच्या निर्णयाला माजी नगरसेवक संघटना, बेळगाव यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.
महानगरपालिकेच्या २ मार्च २०२६ रोजी झालेल्या परिषद बैठकीत विद्यमान मालमत्ता करावर ३ टक्के वाढ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यापूर्वीच मागील वर्षी महानगरपालिकेने मालमत्ता करात वाढ केली असल्याने शहरातील नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
तसेच महानगरपालिकेच्या ठरलेल्या नियमानुसार दर तीन वर्षांनी मालमत्ता करात वाढ करण्यात येते. परंतु या नियमाचे उल्लंघन करून यावर्षी पुन्हा कर वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप माजी नगरसेवक संघटनेने केला आहे. त्यामुळे हा ठराव अन्यायकारक असून नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
यामुळे महानगरपालिकेने २ मार्च २०२६ रोजीच्या बैठकीत मंजूर केलेला ३ टक्के कर वाढीचा ठराव तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. अन्यथा या निर्णयाविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष, सचिव तसेच माजी महापौर, माजी आमदार आणि अनेक माजी नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
