बेळगाव :
येथील बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेचे चित्रकला शिक्षक प्रमोद चिदंबर जोशी उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एन. जोशी होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मोहिते सर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा परिचय करून दिला. व्यासपीठावर कार्यक्रमाचे संयोजक भास्करी सर तसेच वरिष्ठ शिक्षक युवराज पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमोद जोशी यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी कटिबद्धता आवश्यक आहे. त्यासाठी दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतांद्वारे शाळेतील आठवणी आणि अनुभव व्यक्त केले. यानंतर युवराज पाटील, राम गुरव आणि मुख्याध्यापक एस. एन. जोशी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दीपम पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री स्वामी यांनी केले.
