बेळगाव: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतींनी पावन झालेल्या अंदमान-निकोबारमधील सेल्युलर जेलला भेट देण्याचा योग आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरल्याची भावना सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी व्यक्त केली आहे.
“अंदमान” हे नाव ऐकताच प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम उभे राहतात ते स्वा. सावरकर आणि सेल्युलर जेल. “काळ्या पाण्याची शिक्षा” आणि “जयोस्तुते… श्री महन्मंगले” किंवा “ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला” या ओळी मनात घुमू लागतात. या आठवणींनी भारावलेल्या अवस्थेतच अलीकडे सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त अंदमान-निकोबारला भेट देण्याचा योग आला, असे जाधव यांनी सांगितले.
लहानपणीच सावरकरांचे ‘माझी जन्मठेप’ हे आत्मचरित्र वाचल्यानंतर अंदमानला जाण्याची इच्छा मनात निर्माण झाली होती. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे आयुष्य अर्पण करणाऱ्या या महान क्रांतिकारकाने ज्या ठिकाणी अमानुष शिक्षा भोगली, ते स्थळ प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याचा योग मिळाल्याने स्वतःला धन्य समजत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अंदमानमध्ये पोहोचताना विमानातून दिसणारा अथांग निळाशार समुद्र पाहताना सावरकरांनी ब्रायटनच्या समुद्रकिनारी लिहिलेल्या “सागरा प्राण तळमळला” या गीताच्या ओळी आठवत राहिल्या. मातृभूमीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या सावरकरांची ती वेदना मनाला भिडणारी असल्याचे जाधव यांनी सांगितले.
सेल्युलर जेलची रचना पाहताना इंग्रजांच्या क्रूरतेची कल्पना येते. ७ बाय १३ फूट आकाराच्या कोठडीत सावरकरांनी तब्बल अकरा वर्षे शिक्षा भोगली. येथे कैद्यांना तेलाचा घाणा फिरवण्यास भाग पाडले जात असे, चाबकाचे फटके दिले जात आणि अनेक अमानुष अत्याचार सहन करावे लागत. या सर्व जागा पाहताना इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटला, असे जाधव म्हणाले.
येथील ‘लाईट अँड साउंड शो’मध्ये सावरकरांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात येते. तसेच १९४३ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानमध्ये तिरंगा फडकावल्याची ऐतिहासिक आठवणही येथे जपली आहे.
अंदमान-निकोबारमध्ये एकूण ३८ बेटे असून ब्रिटिश काळात त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आली होती. सध्या केंद्र सरकारकडून या बेटांच्या नावांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अंदमान हे केवळ पर्यटनस्थळ नसून स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची साक्ष देणारी पवित्र भूमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी, तरुणांनी आणि कुटुंबीयांनी येथे भेट देऊन देशभक्तीची भावना जागृत ठेवावी, असे आवाहन किरण जाधव यांनी केले.
#Belgav #BedhadakBelgav
