MSME नोंदणीकृत व्यापाऱ्यांवरील दंड रद्द करण्याची मागणी; व्यापार परवाना प्रकरणी महापालिकेला निवेदन

MSME नोंदणीकृत व्यापाऱ्यांवरील दंड रद्द करण्याची मागणी; व्यापार परवाना प्रकरणी महापालिकेला निवेदन

बेळगाव: शहरातील MSME उद्यम नोंदणी असलेल्या व्यापाऱ्यांवर व्यापार परवाना नसल्याच्या कारणावरून बेळगाव महानगरपालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाईविरोधात द बेलगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशन आणि ट्रेडर्स कौन्सिल, बेळगाव यांनी महापालिका आयुक्त कार्तिक एम. (KAS) यांना निवेदन सादर केले आहे.

या निवेदनात शहरातील मोठ्या संख्येने व्यापाऱ्यांनी भारत सरकारच्या MSME उद्यम नोंदणी पोर्टलवर नोंदणी केली असून ती मायक्रो, स्मॉल अँड मिडियम एंटरप्रायझेस डेव्हलपमेंट अ‍ॅक्ट 2006 अंतर्गत करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. लघु व सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ धोरण राबविले जात असल्याने अनेक व्यापाऱ्यांना MSME नोंदणी केल्यानंतर अतिरिक्त परवान्यांची आवश्यकता नसल्याचा समज होता, असेही या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, कर्नाटक म्युनिसिपल कॉर्पोरेशन अ‍ॅक्ट 1976 च्या कलम 353 नुसार महानगरपालिकेला काही व्यवसायांसाठी परवाना देण्याचा अधिकार आहे. मात्र या कायद्याची अंमलबजावणी करताना लघु व सूक्ष्म व्यापाऱ्यांच्या हिताचा विचार करणे आवश्यक असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

अचानकपणे व्यापार परवाना नसल्याच्या कारणावरून दंड आकारल्यामुळे शहरातील छोट्या व्यापाऱ्यांमध्ये चिंता आणि नाराजी निर्माण झाली असून त्यांना योग्य संधी देण्यात यावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर संघटनांनी आयुक्तांकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. MSME नोंदणी असलेल्या व्यापाऱ्यांना कलम 353 अंतर्गत व्यापार परवाना घेण्यासाठी योग्य मुदत देण्यात यावी, आधीच लावण्यात आलेले दंड स्थगित ठेवून त्याचा फेरविचार करण्यात यावा, तसेच MSME नोंदणीकृत व्यापाऱ्यांसाठी व्यापार परवाना आवश्यक आहे की नाही याबाबत महानगरपालिकेकडून स्पष्ट परिपत्रक किंवा सार्वजनिक सूचना जारी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच व्यापार परवाना मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करावी आणि परवाना शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरता येईल अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

बेळगाव हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून हजारो लघु व्यापारी शहराच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देत असल्याचे नमूद करत, या प्रश्नाकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष देऊन व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

हे निवेदन बीसीएमएचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर, सचिव मुकेश खोदा, वरिष्ठ उपाध्यक्ष मुकेश संघवी, उपाध्यक्ष राजू पालीवाला, लालचंदजी चप्रू, नितेश जैन यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी सादर केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × five =

error: Content is protected !!