बेळगाव : ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या शांताई वृद्धाश्रम (सेकंड चाईल्डहुड) या संस्थेला भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये सक्रिय आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर संस्थेच्या प्रतिनिधींना फिट इंडिया मिशनतर्फे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम (विझाग) येथे आयोजित प्रतिष्ठित फिट इंडिया मूव्हमेंट कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

या राष्ट्रीय कार्यक्रमात शांताई वृद्धाश्रमतर्फे श्याम सुमन आजी, अॅलन विजय मोरे आणि चेरिल विजय मोरे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान स्थानिक आमदार तसेच फिट इंडिया प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते संस्थेचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी केलेल्या त्यांच्या समर्पित कार्याचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमातील एक अभिमानास्पद क्षण म्हणजे शांताई वृद्धाश्रमातील आजींना सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्याचा विशेष मान देण्यात आला. फिटनेस आणि आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित या रॅलीला दिलेला हा प्रारंभ ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर आणि प्रत्येक वयात सक्रिय जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.
राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या सन्मानामुळे शांताई वृद्धाश्रमासोबतच बेळगाव आणि कर्नाटकाचेही नाव उज्ज्वल झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या संगोपनाबरोबरच त्यांना निरोगी आणि सक्रिय जीवन जगण्यास प्रोत्साहन देणाऱ्या संस्थेच्या कार्याची देशपातळीवर दखल घेतली गेल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या गौरवाबद्दल युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि फिट इंडिया मिशनचे आभार मानले असून, समाजसेवेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे.
