बेळगाव : मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन कर्नाटक यांच्या वतीने येत्या रविवार दिनांक ८ मार्च रोजी आनंदवाडी आखाडा, बेळगाव येथे भव्य निकाली जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानात राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नामांकित मल्ल सहभागी होणार असून ६० हून अधिक जोड लावण्यात येणार आहेत.
प्रथम क्रमांकाची लढत बाळू अपराध (महाराष्ट्र चॅम्पियन) विरुद्ध हरिश कुमार (हरियाणा केसरी) यांच्यात रंगणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी कामेश पाटील कंग्राळी (कर्नाटक कंठीरेवा) विरुद्ध हितेश पाटील (आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता, पुणे) अशी दमदार कुस्ती होणार आहे. तृतीय क्रमांकासाठी दिग्विजय जाधव (महाराष्ट्र चॅम्पियन) विरुद्ध प्रेम जाधव (कर्नाटक चॅम्पियन) आमनेसामने येतील.
चौथ्या क्रमांकासाठी पार्थ पाटील (कंग्राळी) विरुद्ध बबलू नरळे (सातारा), पाचव्या क्रमांकासाठी प्रथमेश हट्टीकर (कंग्राळी) विरुद्ध धीरज पाटील (सह्याद्री कुस्ती संकुल, पुणे), सहाव्या क्रमांकासाठी कार्तिक (इंगळगी) विरुद्ध पृथ्वीराज पाटील (कंग्राळी) तर सातव्या क्रमांकासाठी विनायक (येळ्ळूर) विरुद्ध राजू (शिनोळी) यांच्यात लढती होतील. तसेच भूमिपुत्र (मुतगा) विरुद्ध ध्रुव (मण्णीकेरी), संभाजी (काकती) विरुद्ध इंद्रजित शेळके (सांगली), प्रणव (उचगाव) विरुद्ध विपुल जावलकर (पुणे) अशा अनेक रंगतदार कुस्त्या होणार आहेत.
महिला दिनानिमित्त विशेष महिला कुस्ती मैदान
८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला कुस्त्यांचेही विशेष आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक व महाराष्ट्रातील नामवंत महिला मल्ल यात सहभागी होणार आहेत.
प्रितम दाभाडे (महाराष्ट्र चॅम्पियन, पुणे) विरुद्ध सुजाता हल्याळ (कर्नाटक चॅम्पियन), प्रांजल तुळजाई (बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेल) विरुद्ध रिंकू नलवडे (पुणे), खुशी खादरवाडी विरुद्ध ऋतुजा रावळ (शहापूर), भक्ती गावडा (मोदेकोप) विरुद्ध रिया बस्तवाड, श्रुती खादरवाडी विरुद्ध प्रणोती पाटील (कोल्हापूर), सुषमा शिंदे (खादरवाडी) विरुद्ध सई किल्लेकर (मजगाव), समिधा बिर्जे (वडगाव) विरुद्ध प्रितम हूले (पुणे) अशा १५ हून अधिक महिला कुस्त्या रंगणार आहेत.
तसेच आकर्षक पुरुष लढतींमध्ये श्रेयस हट्टीकर, गगन अलारवाड (भारतीय वायु सेना स्पोर्ट्स स्कूल) विरुद्ध पांडू तुर्केवाडी यांच्यासह इतर लढती होणार आहेत. उद्घाटन कुस्ती साई गावडे (मुचंडी) विरुद्ध सम्राट पाटील (बेनकनहळ्ळी) तसेच राजवीर पाटील (मंडोळी) विरुद्ध शेखर खादरवाडी यांच्यात रंगणार आहे.
या भव्य जंगी कुस्ती मैदानाचा लाभ सर्व कुस्तीप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष पै. अतुल शिरोळे व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
