चव्हाट गल्लीतील श्री चवाटा मंदिरात होळी उत्सवाची जय्यत तयारी

चव्हाट गल्लीतील श्री चवाटा मंदिरात होळी उत्सवाची जय्यत तयारी

बेळगावातील चव्हाट गल्ली येथे सालाबादप्रमाणे होळी उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात, आनंदात आणि शांततेत पार पडणार आहे. चव्हाट गल्लीतील ग्रामस्थ, पंचमंडळी, चवाटा युवक मंडळ तसेच समस्त युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. यावर्षी चंद्रग्रहणामुळे कार्यक्रमाच्या वेळेत थोडा बदल करण्यात आला असून सर्वांच्या सहमतीने सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

रविवार दिनांक १ मार्च रोजी रात्री दहा वाजता गाडा रंगवण्यासाठी तसेच होळी आणण्यासाठी लागणारे साहित्य बाहेर काढण्यात येणार आहे. हे साहित्य रथावर ठेवून रथ श्री चवाटा मंदिराकडे नेण्यात येणार आहे.

सोमवार दिनांक २ मार्च रोजी होळी आणण्यासाठी चव्हाट गल्लीतील सर्व भक्तगण आणि बैलजोडी धारकांनी दुपारी तीन वाजता किल्ल्यात जमा व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर रात्री बारा वाजता सर्वांनी श्री चव्हाटा मंदिराकडे एकत्र जमून होळी उभी करावयाची आहे.

चंद्रग्रहणाचे वेध लक्षात घेता मंगळवार दिनांक ३ मार्च रोजी सकाळी नऊ ते दहा या वेळेत अग्नी पेटवण्यात येणार आहे. ग्रहण वेध साडेअकरा वाजता सुरू होणार असल्यामुळे अग्नीदानाची वेळ सकाळी ठेवण्यात आली आहे. त्यानंतर ज्या भक्तांना लोटांगण घालावयाचे आहे त्यांनी त्याच वेळेत आपली धार्मिक विधी पूर्ण करावेत.

तसेच मंगळवार दिनांक ३ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता गारान घालण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर नवसाचा नारळ ठरवलेल्या जागेवरून अर्पण करण्यात येईल. अंधारात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना नारळ दिसणार नाही व कोणालाही इजा होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात येत असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

श्री चव्हाटा हे चव्हाट गल्लीतील एक जागृत देवस्थान असून या उत्सवात सर्वांनी शिस्त पाळून, सुरक्षिततेची काळजी घेत आणि आयोजकांना सहकार्य करून उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन पंचमंडळी व युवक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × four =

error: Content is protected !!