बेळगावच्या तृप्ती देसाईची आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक

बेळगावच्या तृप्ती देसाईची आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक

HEST परीक्षेत राज्यात प्रथम, देशात पाचवा; टोरांटो विश्वविद्यालय येथे उच्च शिक्षणासाठी निवड

मच्छे (बेळगाव) : मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या हलशीवाडी, ता. खानापूर येथील कु. तृप्ती मल्लाप्पा देसाई हिने आंतरराष्ट्रीय स्तरावरील HEST (Higher Education Scholarship Test) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून बेळगाव जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले आहे. या स्पर्धात्मक परीक्षेत तिने कर्नाटक राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून देशात पाचवा क्रमांक मिळवला आहे. तसेच जागतिक स्तरावर २१ वा क्रमांक मिळवत तिने आपल्या असामान्य गुणवत्तेची छाप पाडली आहे.

तृप्तीने दोन महिन्यांपूर्वी भारतात झालेल्या ‘सेट’ या परीक्षेतही देशात पाचवा आणि कर्नाटक राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. तब्बल ३५ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या या परीक्षेत तिने मिळवलेले यश अत्यंत उल्लेखनीय मानले जात आहे. मागील १५ वर्षांनंतर कर्नाटक राज्यातील या परीक्षेत यश मिळवणारी ती पहिली मुलगी ठरली आहे.

कु. तृप्ती देसाई ही मराठी केंद्र शाळा, मच्छेची माजी विद्यार्थिनी असून तिच्या या यशामुळे शाळा, गाव आणि संपूर्ण परिसराचा अभिमान वाढला आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी कामगिरी करणे ही मराठी भाषिक समाजासाठी प्रेरणादायी बाब ठरत आहे.

HEST ही परीक्षा विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, विश्लेषणशक्ती आणि अभ्यासू वृत्ती तपासण्यासाठी घेतली जाते. जगभरातील ४० हजारांहून अधिक महाविद्यालये व विद्यापीठे या परीक्षेच्या गुणांच्या आधारे प्रवेश देतात. तृप्तीच्या उल्लेखनीय यशामुळे तिची कॅनडातील नामांकित टोरांटो विश्वविद्यालय येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेले हे विद्यापीठ कॅनडातील अव्वल शैक्षणिक संस्थांपैकी एक म्हणून ओळखले जाते.

तृप्तीच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी तिचे यश प्रेरणादायी ठरत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 1 =

error: Content is protected !!