पुणे – पुणे शहरातून चार नवीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या लवकरच सुरू होणार असून, यामध्ये बहुचर्चित पुणे–बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेसही सुद्धा समाविष्ट आहे. या सेवेमुळे बेळगाव आणि पुणे यांच्यातील प्रवास आणखी जलद आणि आरामदायक होणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, ही ट्रेन सातारा, कराड, सांगली, मिरज मार्गे बेळगावकडे धावणार आहे. सध्या या मार्गावर बस किंवा इतर रेल्वेगाड्यांचा वापर करून ७ ते ८ तास लागतात, मात्र वंदे भारत ट्रेनने हा प्रवास ५ तासांच्या आत पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
तिकीट दर अंदाजे ₹१२०० ते ₹१५०० दरम्यान असण्याची शक्यता असून, एसी कोच, आरामदायक आसने, वाय-फाय, आधुनिक सुविधा आणि वेळेचे काटेकोर पालन ही या गाडीची वैशिष्ट्ये असतील.
ही गाडी लवकरच सुरू होणार असून, ऑगस्ट–सप्टेंबर २०२५ दरम्यान सेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातून एकूण चार वंदे भारत गाड्या नव्याने धावणार असून त्यामध्ये शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगाव या शहरांचा समावेश आहे.
ही सेवा सुरू झाल्यास पुणे–बेळगाव दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक क्रांतिकारी सुविधा ठरेल.
रेल्वे प्रशासनाकडून लवकरच अधिकृत वेळापत्रक आणि बुकिंगची प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे.