गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष परिसंवादाचे आयोजन

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष परिसंवादाचे आयोजन

बेळगाव :गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी च्या वतीने शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त ‘मराठी माध्यम – माझी यशोगाथा’ या विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या मान्यवरांचा सहभाग राहणार आहे.

या परिसंवादात बेळगावातील प्रसिद्ध उद्योजक दांपत्य सोनाली व जयदीप बिर्जे, युवा उद्योजक अक्षता व राहुल पाटील तसेच ॲड. अक्षता व सीए ओमकार सुतार हे सहभागी होणार आहेत.

बिर्जे दांपत्याची उद्योगक्षेत्रातील कामगिरी

सोनाली व जयदीप बिर्जे हे बेळगाव परिसरातील नामांकित उद्योजक असून त्यांची ‘लिओ इंजिनियर्स’ ही कंपनी साखर कारखान्यांसाठी यंत्रसामग्री निर्मितीत अग्रगण्य मानली जाते. मराठी युवकांना जर्मनीमध्ये व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. सोनाली बिर्जे या उच्चशिक्षित असून त्या ‘लिओ इंजिनियर्स’च्या पार्टनर आहेत. नुकत्याच जर्मनी येथे झालेल्या इंडो-जर्मन कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी भारतातील यशस्वी उद्योजिका म्हणून नेतृत्वाची भूमिका पार पाडली. तसेच ‘लिओ ग्रुप लर्निंग एज्युकेशन ऑर्गनायझेशन’च्या प्रमुख व संस्थापक म्हणूनही त्या कार्यरत आहेत. मातृभाषेतून शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी हे दांपत्य सातत्याने पुढाकार घेत आहे.

अक्षता व ओमकार सुतार : मराठी माध्यमातून व्यावसायिक यश

ॲड. अक्षता सुतार यांनी वकिलीची सनद प्राप्त केली असून त्या सध्या टॅक्स कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. ओमकार सुतार यांनी २०२४ साली बँकिंग क्षेत्रातील सीए ही उच्च पदवी संपादन केली असून ते ऑडिट व टॅक्स कन्सल्टंट म्हणून कार्य पाहत आहेत. या दोघांचेही शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून त्यांनी मराठी विद्यानिकेतन येथे शिक्षण घेतले आहे.

सारस ड्रोन कंपनीचे युवा उद्योजक

अक्षता व राहुल पाटील हे ‘सारस’ या ड्रोन निर्मिती कंपनीचे संस्थापक असून भारतीय सैनिकांच्या बहुचर्चित ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान शत्रूंचा शोध घेण्यासाठी त्यांच्या कंपनीचे ड्रोन वापरण्यात आल्याची उल्लेखनीय कामगिरी आहे. दोघांनीही अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले असून राहुल पाटील यांनी एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. दोघांचेही शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून राहुल पाटील हे मराठी विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी आहेत.

कार्यक्रम स्थळ व आवाहन

हा कार्यक्रम सायंकाळी ४.१५ वाजता , गोगटे रंगमंदिर स्कूल ऑफ कल्चर, बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

बेळगावातील मराठीप्रेमी नागरिक, पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री. जयंत नार्वेकर व सचिव सुभाष ओऊळकर यांनी केले आहे.

मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यास उज्ज्वल भविष्य घडू शकते, हा सकारात्मक संदेश या परिसंवादातून समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − 6 =

error: Content is protected !!