बेळगाव: चव्हाट गल्ली येथे होळी व रंगपंचमी सणानिमित्त पंच कमिटीच्या वतीने विशेष सूचना जाहीर करण्यात आली आहे. यंदा होळीचा सण सोमवार दिनांक २ मार्च, तर रंगपंचमी मंगळवार दिनांक ३ मार्च रोजी साजरी करण्यात येणार आहे.
परंपरेनुसार किल्ला परिसरातून माडाचे झाड आणण्याचा कार्यक्रम सोमवार सायंकाळी ५.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.
मात्र मंगळवारी खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे होळीला अग्नी देण्याचा कार्यक्रम दुपारी ३.०० वाजण्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.४५ या कालावधीत ग्रहणकाळ असल्याने सर्व धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम स्थगित ठेवण्यात येणार असून, ग्रहण समाप्तीनंतर पुढील विधी पार पडतील.
तसेच, श्री चव्हाटा देवस्थान येथे यात्रेनिमित्त पूजा विधी सायंकाळी ७.०० नंतर करण्यात येणार असल्याची माहिती पंच कमिटीने दिली आहे.
चव्हाट गल्ली पंच कमिटीच्या वतीने सर्व भक्तगण व बेळगावातील नागरिकांनी वरील वेळापत्रकाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
