हॉकी बेळगावच्या विजेत्या संघांचा लेले मैदानावर सत्कार
बेळगाव : दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय नॅशनल हॉकी चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई करत हॉकी बेळगावने शहराची क्रीडा परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित केली. मुलांच्या व मुलींच्या संघांनी रोहतक व सोनीपत संघांवर मात करत ऐतिहासिक विजय संपादन केला. या यशाबद्दल सकल मराठा समाज, श्रीराम सेना हिंदुस्तान व बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स अँड स्पोर्ट्स यांच्या वतीने लेले मैदानावर खेळाडूंचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
एस्ट्रोटर्फ मैदानाच्या स्वप्नाला चालना
हॉकी बेळगाव च्या एस्ट्रोटर्फ मैदानाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही श्रीरामसेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी दिली. हॉकी बेळगावची समृद्ध परंपरा कायम राखण्यासाठी सकल मराठा समाजाचा पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विजयी संघाची माहिती
कार्यक्रमाच्या प्रारंभी हॉकी बेळगावचे उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर यांनी प्रस्तावना मांडून पाहुण्यांचे स्वागत केले. सचिव सुधाकर चाळके यांनी विजयी संघाच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला. भारत सरकारच्या क्रीडा खात्यांतर्गत ५ ते १० फेब्रुवारीदरम्यान आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत बेळगावच्या दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
परंपरा कायम राखण्याचा निर्धार
बेळगावने देशाला ऑलिम्पिकवीर दिले असून तीच परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी हॉकीपटूंवर आहे, असे रणजीत चव्हाण पाटील यांनी सांगितले. दिल्लीत सुवर्णपदक मिळवत हॉकी बेळगावने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
मान्यवरांची उपस्थिती
सत्कार समारंभाला सकल मराठा समाजाचे समन्वयक संजय सातेरी, सागर पाटील, सुनील बोकडे, श्रीधर खन्नूकर, मनोहर सांबरेकर, भरत नागरोळी, उद्योजक अमोल देसाई, बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स अँड स्पोर्ट्सचे कार्याध्यक्ष अनिल अंबरोळे, हॉकी बेळगावच्या उपाध्यक्षा पूजा जाधव, नामदेव सावंत, मनोहर पाटील, सविता वेसणे, सविता हेब्बार, प्रशिक्षक उत्तम शिंदे, राजू देशनूर, प्रशांत मंकाळे, आनंद रत्नापगोळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी माजी उपमहापौर संजय शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.
