बेळगाव, दि. १९ : द.म.शि. मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षिका कमल हलगेकर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर तसेच शिक्षण समन्वयक सविता पवार उपस्थित होते. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी चित्रप्रदर्शन व गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतींचे आकर्षक प्रदर्शन भरविले होते. विद्यार्थ्यांनी शिवरायांवरील गीते, पोवाडे व भाषणांद्वारे त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला.
अनन्या सूर्यवंशी, समर्थ पाटील, शक्ती व भक्ती ठुमरी, संकल्प हळदणकर यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. संगीत विभागातर्फे समूहगीत सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रसाद सावंत यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु. आरोही पाटील हिने केले. कार्यक्रम देशभक्तीपर वातावरणात उत्साहात पार पडला.
