बेळगाव : शिवजयंतीचे औचित्य साधून मित्रा फाऊंडेशनच्या वतीने साई सोमनाथ आर्केड, पहिला मजला, सोमवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९.३० ते दुपारी २.३० या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपूजेनंतर आरती व ध्येय मंत्राने करण्यात आली. अवघ्या दोन दिवसांत शिबिराची तयारी करण्यात आली असतानाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. एकूण ३८ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
रक्तसंकलनासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथील ब्लड बँकेने मोलाचे सहकार्य केले. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांसाठी हे संकलित रक्त अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
रक्तदान केलेल्या प्रत्येक दात्यास प्रमाणपत्र, शिवरायांवरील पुस्तक व पेन भेट स्वरूपात देण्यात आले. तसेच समाजोपयोगी कार्यासाठी मित्रा फाऊंडेशनचा ब्लड बँकेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी मित्रा फाऊंडेशनचे पदाधिकारी व सदस्य कुलदीप हंगीरगेकर, विकास मांडेकर, जयवंत साळुंके, आनंद काटकर, मारुती गुरव, गुरुनाथ किरमटे, रवींद्र थोरात, महेश पावशे, विशाल मुचंडी, सोमनाथ गोडसे, भाग्यश्री पवार, निलेश गेनजी, अमित शिंदे, मनोहर घाडी, नम्रता काकतकर, शुभम काकतकर आणि ज्ञानेश्वर बेळगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
यापुढेही मित्रा फाऊंडेशन ही संस्था केवळ व्यवसाय क्षेत्रापुरती मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रम राबविणार असून दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, शालोपयोगी उपक्रम आणि व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन अशा विविध योजना राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
#Belgav #BedhadakBelgav
