लिंगराज कॉलेज परिसरात बिबट्यासदृश प्राण्याची अफवा; वन विभागाकडून सतर्कतेचा इशारा

लिंगराज कॉलेज परिसरात बिबट्यासदृश प्राण्याची अफवा; वन विभागाकडून सतर्कतेचा इशारा

बेळगाव (Belgav) : लिंगराज कॉलेज परिसरातील बसवा कॉलनी येथे बिबट्यासारखा दिसणारा वन्यप्राणी फिरत असल्याची माहिती १४ फेब्रुवारी रोजी नागरिकांकडून मिळाल्यानंतर कर्नाटक वन विभागाने तात्काळ घटनास्थळी पाहणी केली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने वन अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसराची तपासणी करत खबरदारीची उपाययोजना हाती घेतली.

वन विभागाने परिसरात कॅमेरा ट्रॅप बसवून हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. मात्र सध्या तरी बिबट्या किंवा तत्सम वन्यप्राणी आढळल्याचे कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत. सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर कोणतेही पुरावेही सापडले नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

दरम्यान, वन विभागाने नागरिकांना अफवा पसरवू नयेत, जुने फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करू नयेत, असे आवाहन केले आहे. तसेच सकाळी लवकर आणि सायंकाळी एकटे फिरणे टाळावे, लहान मुले, पाळीव प्राणी आणि जनावरांची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two + 20 =

error: Content is protected !!