१८ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदीची मागणी; समाजसेवकांचे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१८ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदीची मागणी; समाजसेवकांचे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव / प्रतिनिधी :

१८ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालावी किंवा कडक निर्बंध लावावेत, अशी मागणी समाजसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाढत्या डिजिटल धोक्यांच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली.

समाजसेवक अवधूत तुडवेकर, पद्मप्रसाद हुली, राजू टकेकर, शशिकांत आंबेवाडीकर आणि मायकेल पिंटो यांनी संयुक्तपणे दिलेल्या निवेदनात इंस्टाग्राम, फेसबुक आणि स्नॅपचॅटसारख्या सोशल मीडिया माध्यमांवर अल्पवयीन मुलांचा अनियंत्रित प्रवेश गंभीर परिणाम घडवत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे ‘डीपफेक’ आणि मॉर्फिंगच्या घटनांत वाढ होत आहे. विशेषतः मुलींचे फोटो व व्हिडिओ चोरून त्यांचे आक्षेपार्ह स्वरूपात संपादन केल्याच्या घटना वाढत असल्याचे नमूद करण्यात आले. यामुळे ब्लॅकमेलिंग, सामाजिक बदनामी आणि मानसिक आघाताच्या घटना वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तसेच सोशल मीडियामुळे अल्पवयीन मुलांमध्ये मानसिक तणाव, नैराश्य, आत्मविश्वास कमी होणे, सायबर बुलिंग आणि ऑनलाइन शोषणाच्या घटना वाढत असल्याचे निवेदनात नमूद आहे. ‘रील्स’ आणि लघु व्हिडिओंच्या व्यसनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून शैक्षणिक दर्जा घसरत असल्याचीही चिंता व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून १८ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालावी किंवा कठोर देखरेखीचे धोरण लागू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा समाजसेवकांनी व्यक्त केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five + 6 =

error: Content is protected !!