Belgav (प्रतिनिधी) : कुंती नगर परिसरातील सुमारे ३५० ते ४०० घरांतील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेज समस्येला सामोरे जावे लागत असून या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आज नागरिकांनी केली.
आज सकाळी कुंती नगरमधील नागरिकांनी बेळगाव महापालिका आयुक्तांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले. निवेदनात मागील दोन वर्षांपासून ड्रेनेज पाईपलाईनची कामे अर्धवट अवस्थेत असल्याचे नमूद करण्यात आले. काही ठिकाणी पाईपलाईन योग्यरित्या जोडलेली नसल्याने सांडपाणी रस्त्यावर साचत असून दुर्गंधी व अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे.
गटारांची नियमित स्वच्छता होत नसल्याने डास व कीटकांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. तसेच अर्धवट रस्ते व गटारी यामुळे ये-जा करताना अडचणी निर्माण होत असल्याचेही सांगण्यात आले.
यावेळी बेळगाव महापालिकेच्या अभियंता लक्ष्मी निपाणीकर, श्री राम सेना हिंदुस्थान चे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर तसेच कुंती नगरमधील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुंती नगरमधील ड्रेनेज पाईपलाईन व रस्त्यांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे. महापालिका प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
#Belgav #BedhadakBelgav
