कौटुंबिक कलहाला कंटाळून युवकाची किल्ला तलावात उडी; मृतदेह सापडला

कौटुंबिक कलहाला कंटाळून युवकाची किल्ला तलावात उडी; मृतदेह सापडला

बेळगाव (प्रतिनिधी) : घरातील सततच्या कौटुंबिक कलहाला कंटाळून एका युवकाने किल्ला तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सुभाष हलगेकर (वय ३२, रा. घाडी कॉलनी, शहापूर, बेळगाव) असे मृत युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष हलगेकर हा बेळगाव महानगरपालिका येथे सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता आणि नुकताच नोकरीत कायम झाला होता. मात्र त्याच्या वैवाहिक आयुष्यातील सततच्या वादामुळे तो मानसिक तणावाखाली होता. पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असल्याने त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती.

पत्नी गेल्यानंतर सुभाष मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंद करण्यात आली होती. दरम्यान आज सकाळी परिसरातील किल्ला तलावात एक मृतदेह तरंगताना दिसून आला. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर मार्केट पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संलग्न सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.


⚠️ टीप: मानसिक तणाव किंवा अडचणींचा सामना करत असाल तर जवळच्या व्यक्तींशी बोला किंवा तज्ज्ञांची मदत घ्या. मदत मागणे ही कमजोरी नसून धैर्याची गोष्ट आहे.

#Belgav #BedhadakBelgav

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − eight =

error: Content is protected !!