बेळगाव – ब्रम्हलिंग गल्ली, सुळगा येथील शेखर मनोहर पाटील यांचे सुमारे एक तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट हरविल्यानंतर प्रामाणिक नागरिकामुळे ते सुरक्षितपणे परत मिळाल्याची घटना विजयनगर परिसरात घडली.
शेखर पाटील हे विजयनगर दुसरा स्टॉप येथील अय्यंगार बेकरीमध्ये खरेदीसाठी थांबले असताना त्यांच्या हातातील ब्रेसलेट नकळत खाली पडले. घरी गेल्यानंतर ब्रेसलेट हरविल्याचे लक्षात येताच त्यांनी शोधाशोध केली; मात्र ते सापडले नाही.
दरम्यान, ते ब्रेसलेट विजयनगर येथील रहिवासी विक्रांत रामचंद्र देसाई यांना त्या ठिकाणी आढळले. त्यांनी बराच वेळ त्या परिसरात थांबून कोणी शोधत येते का याची वाट पाहिली. तसेच गेल्या दोन दिवसांपासून ब्रेसलेटच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.
हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य मिथुन उसुलकर यांच्या ओळखीने शेखर पाटील यांचा संपर्क विक्रांत देसाई यांच्याशी झाला. आवश्यक शहानिशा केल्यानंतर विक्रांत देसाई यांनी ते मौल्यवान ब्रेसलेट शेखर पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.
सध्या सोन्याच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना विक्रांत देसाई यांनी दाखविलेली प्रामाणिकता समाजासाठी आदर्श ठरली आहे. विजयनगरचे रहिवासी असलेले विक्रांत देसाई हे पूर्वी शाहापूर, बेळगाव येथे वास्तव्यास होते आणि सध्या शिनोली (कोल्हापूर) येथील Allison Transmission (Dana Fairfield Ltd) या कंपनीत कार्यरत आहेत.
या घटनेमुळे परिसरात प्रामाणिकतेबद्दल सकारात्मक संदेश पसरला असून विक्रांत देसाई यांच्या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
