बेळगाव : शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि सीसीबी पीआय श्री. नंदीश्वर कुंभार यांच्या देखरेखीखाली ‘गुन्हे शोध विशेष पथक’ स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने तातडीची कारवाई करत दोन सराईत आरोपींना अटक करून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.
शहर गुन्हे शाखेचे पीएसआय श्री. मंजुनाथ भजन्त्री यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने संशयित आरोपी १) रजत संजय शिवणगेकर (वय २९, रा. कंग्राळी केएच, ता./जि. बेळगाव) आणि २) विठ्ठल सदेप्पा अरेर (वय ३८, रा. शिगिहळी, ता. बैलहोंगल) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपी क्र. १ याने एपीएमसी पोलिस ठाणे हद्दीत केएलई रुग्णालय रोड परिसरात वाहनचोरी केल्याची कबुली दिली असून (गुन्हे क्र. 132/2024, 110/2024, 172/2023) यांचा समावेश आहे. तसेच आरोपी क्र. २ याने मार्केट पोलिस ठाणे हद्दीत (गुन्हा क्र. 15/2026) दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
आरोपींकडून दोन होंडा अॅक्टिव्हा आणि इतर मोटारसायकलींसह एकूण पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत सुमारे 1 लाख 20 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींविरुद्ध संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंद करून पुढील तपास सुरू आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल पोलिस आयुक्त तसेच डीसीपी यांनी विशेष पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
