मराठी गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने “राजहंसगड ते येळ्ळूर मराठी सन्मान यात्रा” आयोजित करण्यात आली असून या संदर्भातील नियोजनासाठी आज मराठा मंदिर येथे बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष शुभम शेळके होते.
बैठकीच्या सुरुवातीला कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी प्रास्ताविक करत यात्रेचा उद्देश स्पष्ट केला. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी २५० सीमावासीय कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत उपक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
येत्या शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून मराठी सन्मान यात्रेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर बाईक रॅली सुळगा (ये.) मार्गे येळ्ळूर येथे दाखल होईल. येळ्ळूर गावातही बाईक रॅली काढण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील टप्प्यांची माहिती माध्यमांद्वारे जाहीर करण्यात येईल, असे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सांगितले.
सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी बैठकीतील ठराव वाचून दाखविले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल श्रद्धांजलीचा ठराव मांडण्यात आला. तसेच किल्ले रायगड येथील सन्मान यात्रेचे दर्जेदार वृत्तांकन करणारे माणगाव (रायगड) येथील पत्रकार नरेश विठ्ठल पाटील तसेच सीमाभागातील मराठी पत्रकारांचे अभिनंदन करण्यात आले व सहभागी कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले.
सीमाप्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात १६ फेब्रुवारीपासून त्रिसदस्यीय खंडपीठ उपलब्ध होणार असून महाराष्ट्र सरकारने या न्यायालयीन कामकाजाकडे गांभीर्याने लक्ष देऊन गती द्यावी, असा ठराव संमत करण्यात आला. तसेच ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी प्रगतशील लेखक संघ साहित्य संमेलनात सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी सीमाभागात एक लाख सह्यांची मोहिम राबविण्याचे केलेले आवाहन मान्य करत युवा समितीने या उपक्रमात सहभागी होण्याचा ठरावही केला.
या बैठकीला शिवाजी हावळानाचे, अशोक घगवे, मोतेश बारदेशकर, इंद्रजीत धामणेकर, शशिकांत सडेकर, सुरज जाधव, श्रीकांत नांदुरकर, अभिषेक कारेकर, निलेश काकतकर, रोहित जाधव, ओमकार जाधव, साईराज कुगजी, सविता राऊत, अभिजीत मजुकर, प्रतीक गुरव, रणजित हवळाणाचे आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर यांनी आभार प्रदर्शन केले.
