बेळगाव : बँक ऑफ बडोदा उद्यमबाग शाखेत कार्यरत असलेल्या एका महिला बँक कर्मचाऱ्याविरोधात भाषा सक्तीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित महिला कर्मचारी केरळ राज्यातून मागील वर्षी बदलीनिमित्त बेळगाव येथे रुजू झाली असून तिला केवळ मल्याळम भाषा अवगत आहे. तिला कन्नड भाषा येत नाही, या कारणावरून कन्नड संघटनेच्या तथाकथित कार्यकर्त्यांनी थेट बँकेत घुसून आंदोलन करत गोंधळ घातल्याचा आरोप आहे.
या कार्यकर्त्यांनी महिला कर्मचाऱ्याला कन्नड भाषा बोलण्याची व शिकण्याची सक्ती केली. यावेळी संपूर्ण बँकेचे कामकाज ठप्प झाले असून ग्राहकांनाही अडचणींचा सामना करावा लागला. परिस्थिती इतकी बिघडली की, संबंधित महिला कर्मचारी तसेच बँक मॅनेजर यांच्याकडून जबरदस्तीने माफी मागवून घेण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ काढून तो समाजमाध्यमांवर वायरल करण्यात आल्याने प्रकरणाला आणखी गंभीर वळण लागले आहे.
या घटनेनंतर संबंधित महिला कर्मचाऱ्याला सतत फोन करून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तिचा पती परदेशात वास्तव्यास असल्याने ती सध्या भीतीच्या वातावरणात एकटीच राहात असून मानसिक दबावाखाली वावरत आहे.
विशेष म्हणजे, सार्वजनिक ठिकाणी व राष्ट्रीयीकृत बँकेत अशा प्रकारचा गोंधळ घालूनही पोलिस प्रशासनाने ठोस हस्तक्षेप केला नसल्याचा आरोप होत आहे. अशा संघटनांना वेळीच आवर घातला जात नसल्याने भविष्यात अशा घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
भाषेच्या नावाखाली जबरदस्ती, धमकावणे आणि मानसिक छळ या घटनांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.
