बेळगाव : मार्केट पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरात विविध ठिकाणी धडाकेबाज कारवाई करत मटका जुगार खेळणारे व गांजा सेवन करताना आढळलेले एकूण सात आरोपी अटक केले आहेत. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पहिल्या प्रकरणात खंजर गल्ली येथील सार्वजनिक ठिकाणी मटका जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मार्केट पोलीस ठाण्याचे पीएसआय श्री. विठ्ठल हावन्नावर व त्यांच्या पथकाने छापा टाकला. यामध्ये मोहम्मदशफी मोहिनसाब तहसीलदार (वय ६९) व ऐमन हसनसाब चिक्कोडी (वय ३३, दोघेही रा. खंजर गल्ली, बेळगाव) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून ३,०५० रुपये रोख रक्कम व मटका जुगाराच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४/२०२६ कलम ७८(III) के.पी. ॲक्ट अंतर्गत नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.
त्यानंतर मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा सेवन करताना संशयास्पदरीत्या वावरत असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. केंद्र बस स्थानक परिसर व इतर सार्वजनिक ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. यात मोहम्मददिलशाद मोहम्मदनसीम अन्सारी (३०), दानिश सैयद (२३), मोहम्मदराजा नूरअहमद इनामदार (२७), मोहम्मदनस कलिलअहमद (३०) व सलमान अन्सारी नियाजुद्दीन (३५) यांचा समावेश आहे. वैद्यकीय तपासणीनंतर संबंधित आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम २७(ब) अंतर्गत स्वतंत्र गुन्हे (गुन्हा क्रमांक २५/२०२६ ते २९/२०२६) दाखल करण्यात आले आहेत.
एकूण सहा प्रकरणांत सात आरोपींना अटक करण्यात आली असून मटका जुगारातून मिळालेली ३,०५० रुपये रोख रक्कम व संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई करणारे पीएसआय व पोलीस कर्मचाऱ्यांचे कार्य पोलीस आयुक्त, बेळगाव शहर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
