मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे ‘मराठा दिन’ गौरवपूर्ण वातावरणात साजरा

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे ‘मराठा दिन’ गौरवपूर्ण वातावरणात साजरा

बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी मराठा दिन अत्यंत गौरवपूर्ण, शिस्तबद्ध आणि अभिमानास्पद वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी शर्कत युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा जवानांना मानवंदना देऊन करण्यात आली. या समारंभाचे नेतृत्व कमांडंट यांनी केले. यावेळी अधिकारी, जेसीओ, जवान तसेच माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या स्मृतींना उजाळा देत मराठा रेजिमेंटच्या शौर्य, त्याग आणि कर्तव्यभावनेची गौरवशाली परंपरा अधोरेखित करण्यात आली.

यानंतर सायंकाळच्या कार्यक्रमांची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर कमांडंट ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी, डेप्युटी कमांडर कर्नल व्ही. के. बी. पाटील तसेच उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते केक कापून मराठा दिन साजरा करण्यात आला.

या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभेदार मेजर संदीप खोत यांनी केले. त्यांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटचा गौरवशाली इतिहास उपस्थितांसमोर मांडला.

सायंकाळच्या कार्यक्रमांमध्ये शस्त्रपराक्रम व योद्धा वृत्तीचे दर्शन घडवणारे मार्शल आर्ट्सचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यानंतर भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारा ‘भजन रॉक्स’ हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सहभागी कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला कमांडंट ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी तसेच मृणालिनी मुखर्जी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. याशिवाय वरिष्ठ अधिकारी, नागरिक, माजी सैनिक तसेच जवानांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

४ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण मराठा रेजिमेंटमध्ये मराठा दिन म्हणून साजरा केला जातो. १६७० साली याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याजवळील कोंढाणा किल्ला (आजचा सिंहगड) जिंकला होता. या ऐतिहासिक लढाईत पराक्रमी योद्धा तानाजी मालुसरे यांनी अतुलनीय शौर्य दाखवत सर्वोच्च बलिदान दिले होते. त्यांच्या स्मरणार्थ आणि मराठा रेजिमेंटच्या शौर्यपरंपरेच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × four =

error: Content is protected !!