बेळगाव : ज्येष्ठ व नामवंत चित्रकार के. बी. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सन २०२० मध्ये मोठ्या थाटात जयंती साजरी करण्यात आली होती. त्यानंतर दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य स्वरूपात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच परंपरेनुसार यंदाही बुधवार दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी बेळगावच्या या महान सुपुत्राची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम बेळगाव येथील वरेकर नाट्यसंघाच्या सभागृहात सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे. जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा, पुरस्कार वितरण, चित्रप्रदर्शने, प्रात्यक्षिके, सत्कार, सादरीकरणे, व्याख्याने व चर्चासत्र असे विविध कलाविषयक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या कार्यक्रमास मुंबईचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार माननीय श्री. दत्तात्रेय पाडेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तरुण भारत समूहाचे प्रमुख व सल्लागार संपादक श्री. किरण ठाकूर हे असतील.
बेळगाव व परिसरातील चित्रकार, चित्रकलेचे विद्यार्थी तसेच चित्ररसिकांसाठी ही जयंती एक महत्त्वाची पर्वणी ठरणार असून कला व संस्कृतीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
