भारत विकास परिषदेतर्फे वंदे मातरम् १५० वर्षपूर्तीनिमित्त सामूहिक गायन कार्यक्रम उत्साहात

भारत विकास परिषदेतर्फे वंदे मातरम् १५० वर्षपूर्तीनिमित्त सामूहिक गायन कार्यक्रम उत्साहात

बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे वंदे मातरम् या अमर देशभक्तीपर गीताच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त परिषदेच्या सदस्यांचा सामूहिक गायन कार्यक्रम वीर सौध, काँग्रेस विहीर गांधी उद्यान येथे अपूर्व उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात परिषद सदस्यांनी संपूर्ण वंदे मातरम् तसेच विविध देशभक्तीपर समूहगीते एकस्वर-तालात सादर करत भारतमातेला अनोखी मानवंदना अर्पण केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, ‘वंदे मातरम्’ हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेले गीत असून ते त्यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीत समाविष्ट आहे. हे गीत भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा बनले असून देशभक्तीचे प्रतीक आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी ते प्रथम गायले आणि १९५० मध्ये भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून घोषित करण्यात आले. ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या प्रत्येक आंदोलनात ‘वंदे मातरम्’चा जयघोष प्रेरणादायी ठरला. स्वातंत्र्यसैनिकांसाठी हे गीत मातृभूमीवरील प्रेम आणि प्रतिकाराचे प्रतीक बनले असून या स्वातंत्र्यमंत्राला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर परिषद सदस्यांनी संपूर्ण वंदे मातरम्, जयोस्तुते श्री महन्मंगले, उधळीत शतकिरणा, ताई भारतीय पादपद्मगळ पूजिसोन, विश्वविनुतन विद्याचेतन सर्व हृदय संस्कारी, हम होंगे कामयाब आदी देशभक्तीपर गीते सामूहिकरित्या सादर केली. या सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये राष्ट्रचैतन्य निर्माण झाले. विनायक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करून हे सामूहिक गायन अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अक्षता मोरे यांनी केले, तर राष्ट्रीय महिला कार्यकारिणी सदस्य स्वाती घोडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास भारत विकास परिषदेचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

छायाचित्र : भारत विकास परिषदेतर्फे आयोजित सामूहिक वंदे मातरम् कार्यक्रमात विनायक मोरे, स्वाती घोडेकर, अक्षता मोरे व परिषद सदस्य.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − 1 =

error: Content is protected !!