स्वामी समर्थ आराधना केंद्रात पालखीचे जल्लोषात स्वागत

स्वामी समर्थ आराधना केंद्रात पालखीचे जल्लोषात स्वागत

बेळगाव :
स्वामी समर्थांच्या पालखीचे आज सायंकाळी हट्टीहोळ गल्ली, शहापूर येथून महाद्वार रोडवरील स्वामी समर्थ आराधना केंद्रात सायंकाळी साडेपाच वाजता आगमन झाले. यावेळी स्वामी समर्थ आराधना केंद्राचे नारायण पाटील, सुनील चौगुले यांच्यासह असंख्य भक्तांनी जल्लोषात पालखीचे स्वागत केले.

ज्ञानेश्वरी भजनी मंडळ, हंदिगणूर यांनी टाळ–मृदंगाच्या गजरात भजन सादर करत संपूर्ण परिसर भक्तीमय व उत्साही केला. उपस्थित भाविकांनी पुष्पवृष्टी करत पालखीचे स्वागत केले. मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालिमिरची यांच्यासह अनेक मान्यवरांनीही पालखीचे दर्शन घेऊन स्वागत केले.

यानंतर महाद्वार रोड परिसरात पालखीची परिक्रमा करण्यात आली. तानाजी गल्लीमार्गे पालखी पुन्हा स्वामी समर्थ आराधना केंद्रात विसावली. वाटेत विविध ठिकाणी पुष्पवृष्टी, आरती व स्वागत करण्यात आले. रस्ते भगव्या पताका व आकर्षक रांगोळ्यांनी सजविण्यात आले होते. शेकडो आबालवृद्ध सहभागी झालेल्या या परिक्रमेमुळे संपूर्ण परिसर अध्यात्मिक वातावरणाने भारावून गेला.

यानंतर शेकडो भक्तांनी स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी अनंत लाड, मधु गुरव, विकास मजुकर, प्रसाद नार्वेकर, राहुल मुचंडी, जितेंद्र बामणे, संजू हिशोबकर, अशोक बामणे, रवी मोरे, संजय बर्डे, राजेश गोजगेकर, श्रीपाद पाटील, अंकुश शाह, भाऊसाहेब कनबरकर, सुनील यादव, रवींद्र पाटील, किशोर गरगट्टी, भाऊ मंडोळकर, उदय अष्टेकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी नगरसेविका वैशाली हुलजी, पार्वती भातकांडे, विजया चौगुले, लक्ष्मीनारायण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अध्यात्म समाजाला तारेल – जे. एम. कालिमिरची
पालखी पूजनानंतर उपस्थितांशी बोलताना मार्केटचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिरची म्हणाले, “योग, ध्यान आणि अध्यात्म या तीन गोष्टीच समाजाला तारू शकतात. तरुण पिढीत वाढत चाललेली व्यसनाधीनता रोखायची असेल, तर अध्यात्माची सुरुवात घराघरातून झाली पाहिजे. त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार होतील व अनिष्ट गोष्टींना आळा बसेल.”

आज पालखी खासबागेत
उद्या बुधवार, दि. २१ रोजी पहाटे श्रीमूर्ती व पादुकांचा महाअभिषेक झाल्यानंतर पालखी खासबागकडे रवाना होणार आहे. खासबाग ओम नगर येथील दीपक खोबरे यांच्या निवासस्थानी अभिषेक, पूजा व आरती होणार असून, सायंकाळी टिळकवाडी येथील समृद्धी शिंदे यांच्या निवासस्थानी पालखीचा मुक्काम राहणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 + four =

error: Content is protected !!