बेळगाव :
चलवेनहट्टी येथील भाविक येत्या रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी सौंदत्ती येथील रेणुका देवी (यल्लामा) यात्रेसाठी रवाना होणार आहेत. ही यात्रा शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावी, असे आवाहन ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ठरलेल्या कार्यक्रमानुसार रविवार, दि. २५ जानेवारी रोजी सकाळी गावातून यात्रेसाठी प्रस्थान करण्यात येणार असून जोगुळभावी येथील परड्या भरून रेणुका देवीचा डोंगर चढण्यात येणार आहे. मंगळवार, दि. २७ जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस असून या दिवशी यात्रास्थळी परड्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे.
बुधवार, दि. २८ जानेवारी रोजी भाविक यात्रेहून गावाकडे परत येणार असून लक्ष्मी देवस्थान येथे मुक्काम करण्यात येणार आहे. त्यानंतर गुरुवार, दि. २९ जानेवारी रोजी दुपारी गावातील लक्ष्मी देवस्थान येथे परड्या भरणे तसेच मार्ग मळणे हा धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे.
या यात्रेदरम्यान सर्व भाविकांनी एकोप्याने, श्रद्धा व शांततेत यात्रा साजरी करावी, असे आवाहन ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.
