बेळगाव : छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन शुक्रवारी सकाळी ७ वाजता बेळगावातील धर्मवीर संभाजीराजे चौकात भक्तिभाव व उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकास दुग्धाभिषेक घालून विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर नगरसेवक जयतीर्थ सौन्दती व सुनील जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला भव्य हार अर्पण करण्यात आला असून परिसर फुलांच्या आकर्षक सजावटीने सजवण्यात आला होता.
याप्रसंगी बोलताना माजी आमदार अनिल बेनके यांनी सांगितले की, १६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला असून हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आहे. अल्प वयात युवराजपद व त्यानंतर छत्रपतीपद स्वीकारून संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी अपार पराक्रम गाजवला. त्यांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचा आदर्श आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे त्यांनी नमूद केले.
स्मारक समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी आपल्या भाषणात छत्रपती संभाजी महाराजांचे स्वराज्य रक्षणातील योगदान अधोरेखित केले. त्यांनी संपूर्ण आयुष्य स्वराज्याच्या संरक्षणासाठी अर्पण केले असून त्यांचा प्रेरणादायी इतिहास बेळगाव शहरात स्मारकाच्या माध्यमातून कायम जिवंत ठेवण्याचा समितीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास नगरसेवक जयतीर्थ सौन्दती, धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह प्रसाद मोरे, श्रीनाथ पवार, निशांत कुडे, मारुती पाटील, यश पाटील, आदित्य पाटील, सुशांत तरहळेकर, निखिल पाटील, उदित रेगे, किसन खांडेकर, योगेश भोसले, भरत काळगे तसेच स्मारक समितीचे सदस्य, महिला, युवक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
