बेळगाव – शहर पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली 13 जानेवारी 2026 रोजी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या विशेष कारवाईत अवैध दारू विक्री, गांजाचे सेवन तसेच जुगार खेळताना चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरोधात कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
टीळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररीत्या दारू विक्री करत असताना अशोक गुंडू भजंत्री (वय 31, रा. नंदगड, सध्या अंबेडकर नगर, अनगोळ, बेळगाव) यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून 160 रुपये किमतीच्या 90 मिलीच्या दोन दारू पाउच जप्त करण्यात आल्या असून टीळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 06/2026 अन्वये अबकारी कायदा 1965 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयास्पदरीत्या वावरताना नदीम हुसेनसाब देसाई (वय 33, रा. शिवाजी नगर, बेळगाव) यास ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गांजाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरोधात मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 07/2026 अन्वये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिराबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसस्थानकाजवळ सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करत असताना निखिल बसवराज हंपण्णवर (वय 20, रा. बसवाण, बेळगाव) यास अटक करण्यात आली. याप्रकरणी हिराबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 07/2026 अंतर्गत एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई सुरू आहे.
याच ठाण्याच्या हद्दीत काकती गावाजवळ सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळताना भीमप्पा सिद्धप्पा नायक (वय 50, रा. लक्ष्मी नगर, काकती, बेळगाव) यास रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीकडून 1,300 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून हिराबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 08/2026 अन्वये के.पी. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चारही प्रकरणांत एकूण चार आरोपी अटकेत असून त्यांच्याकडून एकूण 1,460 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शहर पोलीस आयुक्त, बेळगाव तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
