बेळगाव शहर सायबर पोलिसांची मोठी कारवाईकंबोडियात अडकवलेल्या भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

बेळगाव शहर सायबर पोलिसांची मोठी कारवाईकंबोडियात अडकवलेल्या भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

बेळगाव – कंबोडियामध्ये आमिष दाखवून सायबर फसवणुकीसाठी अडकवण्यात आलेल्या भारतीय नागरिकांची बेळगाव शहर सायबर पोलिसांनी यशस्वीपणे सुटका केली आहे. या प्रकरणात बेळगाव येथील तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

बेळगावच्या पार्वती नगर व उद्यमबाग परिसरातील आकाश विठ्ठल कागिनकर तसेच ओंकार व संस्कार लोखंडे या तरुणांना बँकॉक व हाँगकाँग येथे डेटा एन्ट्रीचे काम असून महिन्याला 1 लाख 25 हजार रुपयांचे वेतन मिळेल, असे खोटे आश्वासन देण्यात आले. आरोपी प्रसन्न हुंदरे (शहापूर, बेळगाव) याने एजंट आसिफ व अमित (पंजाब) यांच्या मदतीने एकूण 2 लाख 50 हजार रुपये घेतले. त्यानंतर या तरुणांना कंबोडियाला नेऊन सायबर फसवणूक करण्यास भाग पाडण्यात आले.

तेथे भारतीय नागरिकांकडून दररोज मोठ्या प्रमाणात सायबर फसवणूक करून घेतली जात होती. काम करण्यास नकार दिल्यास मोबाईल जप्त करून एका खोलीत डांबून ठेवले जात होते. अशा प्रकारे सुमारे 15 ते 20 भारतीय नागरिकांना अडकवण्यात आल्याची माहिती आहे.

या प्रकरणी पीडितांच्या नातेवाइकांनी संशय व्यक्त केल्यानंतर 25 डिसेंबर 2025 रोजी सचीन् विठ्ठल कागिनकर यांनी बेळगाव शहर सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक 102/2025 दाखल करून बीएनएस व आयटी कायद्यातील संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला.

तपासादरम्यान बेळगाव सायबर पोलिसांनी बेंगळुरू इमिग्रेशन कार्यालय व सीबीआयशी संपर्क साधून तिघांच्या भारतात परत येण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या. त्यानुसार 9 जानेवारी 2026 रोजी हे तिघेही तरुण सुखरूपपणे भारतात परतले.

या संपूर्ण कारवाईत बेळगाव शहर सायबर गुन्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त व डीसीपी यांनी सायबर पोलिसांचे कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − 6 =

error: Content is protected !!