महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती सोमवार, दि. १२ जानेवारी रोजी समितीच्या कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

समितीचे समाजमाध्यम प्रमुख साईनाथ शिरोडकर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे, तर चिटणीस प्रतीक पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रतीक पाटील यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, १२ जानेवारी रोजी सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे जन्मलेल्या राजमाता जिजाऊ यांनी अंधकारमय काळात स्वराज्याची पणती प्रज्वलित केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि रयतेला केंद्रस्थानी ठेवणारे, सर्वसामान्यांचे राज्य उभे राहिले.

पाटील पुढे म्हणाले की, जसे स्वराज्य सर्वसमावेशक होते, तसाच संदेश स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण जगाला दिला. १८९३ साली झालेल्या जागतिक धर्मपरिषदेत “माझ्या प्रिय बंधू भगिनींनो” असे संबोधन करत त्यांनी भारत हा सर्व धर्म, समाज व घटकांना सामावून घेणारा देश असल्याचे जगासमोर अधोरेखित केले. “हे विश्वाची माझे घर” या विचारधारेनुसार भारत देश माणुसकी, सहिष्णुता व शांततेचा आद्य समर्थक राहिला आहे. आजच्या काळात भारताची ही प्रतिमा अधिक बळकट करण्याची गरज असून, “वसुधैव कुटुंबकम” ही संकल्पना पुन्हा एकदा जगाला पटवून देणे आपले कर्तव्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष राजू कदम, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार विनायक कावळे, सुरज कुडूचकर, आनंद पाटील यांच्यासह समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 3 =

error: Content is protected !!