बेळगाव : शहरातील तिसऱ्या गेट (गेट क्र. ३८१) येथील दक्षिण पश्चिम रेल्वे अंतर्गत बांधण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाबाबत नागरिकांनी नोंदवलेल्या तक्रारीवर दक्षिण पश्चिम रेल्वे प्रशासनाने अधिकृत खुलासा केला आहे. संबंधित उड्डाणपूलाचा दोन लेनचा भाग १९ मे २०२५ रोजी कार्यान्वित करून तो रस्ते प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्याकडून सार्वजनिक तक्रार निवारण प्रणालीद्वारे सादर करण्यात आलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे व रस्त्याच्या सतत वापरामुळे काही ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागाचे नुकसान झाले होते. मात्र ही ठिकाणे रस्ते प्राधिकरणामार्फत दुरुस्त करण्यात आली असून सध्या रस्त्याची अवस्था असुरक्षित असल्याचे कोणतेही निरीक्षण नाही.
उड्डाणपुलाच्या उर्वरित दोन लेनचे काम सध्या प्रगतीपथावर असून ते सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करून कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, शहरातील दाट वाहतूक आणि गजबजलेल्या परिसरात सुरू असलेल्या कामामुळे विलंब होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तथापि, योग्य नियोजन व विशेष प्रयत्नांच्या माध्यमातून उड्डाणपूलाचे संपूर्ण काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे दक्षिण पश्चिम रेल्वे प्रशासनाने नमूद केले आहे.
