बेळगाव – टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटकांमध्ये तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी एकूण साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
सावरकर रोड, टिळकवाडी येथील एका घरात आणि हिंदवाडीतील अमित डीलक्स लॉजिंगमध्ये नुकत्याच झालेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित प्रकरणांमध्ये तक्रार नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान काही संशयितांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान चोरट्यांकडून पाच लाख 70 हजार रुपये किमतीचे 58.860 ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे कंकण, दोन लाख 50 हजार रुपये किमतीची यामाहा मोटरसायकल आणि दहा हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण 8 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सध्या या प्रकरणांतील नेमके चोरटे कोण हे स्पष्ट झालेले नसून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असल्याची माहिती टिळकवाडी पोलीस निरीक्षक परशराम पुजारी यांनी दिली. त्यांनी याप्रकरणी लवकरच आरोपींचा छडा लावण्यात येईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.