बेळगाव (प्रतिनिधी) : नववर्ष साजरे होत असतानाच बेळगाव येथील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाबाहेर धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तींनी कारागृहाच्या संरक्षण भिंतीजवळ येत मोबाईल फोन, सिमकार्ड व अमली पदार्थ आत फेकल्याचा प्रकार समोर आला असून, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास चेहऱ्यावर मास्क बांधलेला एक इसम कारागृहाच्या भिंतीजवळ आला. त्याने कपड्यात बांधलेली संशयास्पद वस्तू कारागृहाच्या आवारात फेकून क्षणार्धात पलायन केले. फेकण्यात आलेल्या पॅकेटमध्ये मोबाईल, सिमकार्ड तसेच अमली पदार्थ असल्याचा संशय आहे.
हिंडलगा मध्यवर्ती कारागृह परिसरात अशा प्रकारच्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कारागृह प्रशासनासह पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे. कारागृहाच्या बाहेरील परिघात सुरू असलेल्या या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांकडून कडक उपाययोजना करण्यात येत आहेत.
ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून कारागृहाच्या सुरक्षेचा सखोल आढावा घेतला जात आहे.
